तुझ्या टपोर डोळ्यात
काजव्याचं घरकुल
माझ्या अंधाऱ्या रानात
तेच प्रकाशाचं फूल
गूज तुझ्या पावलांची
रुणझुण छुनछुन
माझ्या स्वप्नांच्या पखाली
देते भरून भरून
गंध वादळी वाऱ्याचा
तुझ्या स्पर्शात साधतो
माझी इवलीशी नाव
मी ही किनारा मागतो
धुंदी तुझ्या गं प्रेमाची
माझ्या नजरी भरली
कशी श्वासात भिनली
आणि मनात तरली
काटे तुझ्या विरहाचे
जीव कसा सोसणार
ये तू पुन्हा घरट्याला
मी तो क्षण वेचणार
- आशिष भोजने
댓글