चित्रकार झालो असतो मी
पण रंगीत आकारांचे प्रकार
कधी कळलेच नाही
स्वर झंकारले असते हातून माझ्या
पण संगीताचे लय आणि ताल
कधी कळलेच नाही
मीही कदाचित आळवले असते राग
किंवा घातली असती सुरेल साद
पण स्वर आणि त्यांचे आलाप
कधी कळलेच नाही
मी एक चोर आहे
शब्दचोर
मला फक्त चोरी कळते शब्दांची
मी शब्द चोरतो
कधी माझ्या भावनांच्या बंधातून
कधी तुझ्या श्वासांच्या गंधातून
तर कधी कधी त्रासून सोडणाऱ्या
तिऱ्हाइक नजरांच्या द्वंदातून
मी पाकळीच्या रंगाकडून
आणि फुलाच्या सुगंधाकडून अभिव्यक्ती मागतो
आणि त्यात जतन करून ठेवतो माझा शब्दठेवा
एकदा रंगा-गंधातले शब्द
कागदावर सांडले
तू म्हणालीस, ही तर कविता झाली
पण सत्य तर एवढेच आहे
की मी एक चोर आहे
... एक शब्दचोर
- आशिष भोजने
Comments