मीही पाहिलेत काही पावसाळे
अन उन्हाच्या झळाही सोसल्यात
सल काय असतं
मीही अनुभवतो रोजच
जेव्हा निद्राधीन शरीरात
एक मेंदू आणि एक हृदय
आत्यंतिक द्वंद्व करीत
रोजचे जिव्हारी घाव घालतात
आज मात्र एक नवीनच पाऊस
तुझ्या पापणीच्या कुशीत
विसावलेला पहिला
पाऊस तास जुनाच
मात्र अनपेक्षित भेट झाली
अनपेक्षित ठिकाणी
थोडा थरथरतंच तो
तुझ्या डोळ्यातुन उभा झाला
सावकाशपणे कडा ओलावीत
अगतिकपणे स्तब्ध झाला
अन मी...
मी सौम्य शब्दांच्या अपेक्षेबदल्यात
तुला ज्ञात असलेले तत्वज्ञान
काहीश्या अनाकलनीय
अन जड भाषेत
तुझ्या पुढ्यात विसर्जित केले
अन तुही
तुझे जड मन
माझ्यापुढे हलके करता करता
माझ्या तत्वहीन तत्त्वज्ञानाच्या
अवजड संज्ञांना
कवितेसारखी दाद देऊन
क्षणिक मोकळेपणा साधला
१.
मी निघालो त्या आधी
मी कितीतरी वेळ
तुझ्या डोळ्यातील पावसाळा
टक लावून टिपत होतो
तुझ्या डोळ्यातील पाऊस
प्रत्येक प्रश्नांकित भावनेमागे
तसाच थरथरत उभा होता
तुझ्या डोळ्यांवाटे
माझ्या डोळ्यांदेखत
त्याच कडा पुन्हा पुन्हा ओलावीत
अगतिकपणे स्तब्ध होत होता...
२.
मी निघालो त्यावेळी
किंबहुना त्या आधीच
तुझे नेहेमीचे मृदू हास्य
तुझ्या चेहऱ्यावर तरळत
तू मला सार करत होतीस
तूच मला 'काळजी घे'
असे फर्मानवजा टाटा केलेस
तेव्हा परत मी टिपला
तो थरथरणारा पाऊस
कडा ओलावून स्तब्ध होताना
३.
मी निघून गेल्यावर
तुझा पाऊस
किती वेळा थरथरला
किती वेळा तरळला
किती वेळा बरसला
आणि किती वेळा स्तब्ध झाला
याचे गणित माझ्यासाठी अनाकलनीयच
मी निघून गेल्यानंतर
मी तुला दिलेल्या
कुचकामी संवेदनवजा तत्वज्ञानावर
माझ्या मेंदूत प्रक्रिया करीत सुटलो
अर्थ नव्हताच! मग निघणार कसा?
डोळे बंद करून डोळाभर पहिले
परत परत
तुझे पावसाळी डोळे दिसले
आणि या वेळी
तुझ्या डोळ्यातून थरथरणारा पाऊस
माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावीत
अगतिकपणे
माझ्या पापण्यांच्या कुशीत विसावला
स्तब्ध होऊन!
- आशिष भोजने
Yorumlar