सर सर मनामध्ये खाली वर खाली झालं
आठवण अशी आली डोळ्याकाठी पाणी आलं
सर्र्कन झर्र्कन दिस येतो दिस जातो
गेल्या दिसामागे सल रातभर दिस देतो
रातीचं धुकं माझं दवामध्ये ताजं झालं
आठवण अशी आली डोळ्याकाठी पाणी आलं...
काल कालचीच साद काल कालचीच बात
मी ही होतो तू ही होती आपली ती जागरात
बोल-चाल बाता-बात अंतरानं कमी झालं
आठवण अशी आली डोळ्याकाठी पाणी आलं...
माझा दिस तुझी रात दोन्ही रातीचा दिवस
वेळाची ही घालमेल दिलाची ही घासाघीस
तुझी गाठ घेता घेता मन ठार वेडं झालं
आठवण अशी आली डोळ्याकाठी पाणी आलं...
- आशिष भोजने
Kommentare